शारजा :– रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्धची तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणारा अफगाणीस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुखी सामन्याचा मानकरी ठरला.
या दोन संघातील ही मालिका शारजात सुरु आहे. पहिला सामान 6 गडी राखून जिंकलेल्या अफगाणिस्तानने रविवारी झालेला दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इमाद वासीम व स्वतः कर्णधार शादाब वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
इमादने 57 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. शादाबने 32 धावा करताना 25 चेंडूत 3 चौकार फटकावले. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 6 बाद 130 असा रोखला गेला. अफगाणीस्तानकडून फजलहक फारुखीने 2 गडी बाद केले.
अफगाणीस्तानने 19.5 षटकांत 3 गडी गमावून 133 धावा केल्या व या सामन्यातील विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. अफगाणीस्तानकडून सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाजने 49 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली.
Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच
इब्राहीम झद्रानने 40 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. नजीबुल्लाह झद्रानने 12 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 23 धावांची खेळी केली. त्याला योग्य साथ देताना महंमद नबीने 9 चेंडूत एका षटकारासह नाबाद 14 धावा केल्या. पाकिस्तानकडून झमान खान व हसनुल्लाह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.