इम्रान खान यांनी जिंकला विश्‍वास दर्शक ठराव

इस्लामाबाद  – पाकिस्तानातील इम्रान खान सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केल्याने या सरकारवर गेले काही दिवस असलेली अनिश्‍चीततेची टांगती तलवार आता दूर झाली आहे. 342 सदस्यांच्या सभागृहात त्यांच्या सरकारला 178 मते मिळाली. बहुमतासाठी 172 आकडा गाठणे आवश्‍यक होते. तेवढे संख्याबळ त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणावर त्यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

11 राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटने या मतदानावर बहिष्कार घातला होता. तथापि सरकारच्या पाठिशी बहुमत असल्याचे लक्षात आल्यानेच त्यांनी हा बहिष्कार घातला असा दावा पंतप्रधान इम्रानखान यांच्या समर्थकांनी केला आहे. तथापि त्यांच्या बहिष्कारानंतरही सरकारने सभागृहात रितसर ठराव मांडून त्यावरील मते नोंदवून घेतली. त्यात त्यांना 178 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.

इम्रान खान यांच्या सरकार मधील अर्थमंत्री अब्दुल हाफिज शेख यांचा सिनेट निवडणुकीत पराभव झाल्याने पंतप्रधानांनी संसदेत आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी हा विश्‍वास दर्शक ठराव मांडला होता. त्यात इम्रानखान यांच्या नेतृत्वाखालील तहरीक ई इन्साफ पक्षाचे 157 सदस्य आहेत. बाकीची मते सरकारच्या मित्र पक्षांची आहेत. पुर्ण संख्येने इम्रानखान यांनी आपले बहुमत सिद्ध केल्याने त्यांची देशाच्या राजकारणावरील पकड आणखी मजबूत झाली असल्याचे मानले जात आहे. गेले काहीं दिवस विरोधी आघाडीकडून सरकारच्या विरोधात देशभर मोठी वातावरण निर्मीती करण्यात आली होती. त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.