नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे सर्वोच्च न्यायालयात 15 मार्चपासून दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र, या 15 मार्च पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता सर्वोच्च न्यायलयाने आखून दिली आहे.
प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची मागणी वकीलांच्या अनेक संघटनांनी केली होती. प्रायोगिक तत्वावर आणि पथदर्शी म्हणून मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अंतीम सुनावणी किंवा नेहमीची सुनावणी मर्यादित स्वरूपात होईल. त्याचा निर्णय पक्षकारांची संख्या पाहून ठरवण्यात येईल, मर्यादित कोर्टरूममध्ये ही सुनावणी घेण्यात येईल. सोमवारी आणि शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सुनावणी घेण्यात येईल, असे या आचारसंहितेत स्पष्ट केले आहे.
करोनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक कोर्ट रूममध्ये कोणत्याही वेळेस वकील आणि पक्षकार मिळून 20 जणांना प्रवेश देण्यात येईल. त्यापेक्षा अधिक वकील किंवा पक्षकारांची संख्या असल्यास विडिओ कॉन्फरन्सिंग आथवा टेली कॉन्फरन्सिंगने सुनावणी घेण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्ष सुनावणीत पक्षकारांचा सहभाग प्रत्यक्ष ठेवायचा की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा ठेवायचा याचा निर्णय खंडपीठ घेईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा