Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल हसनत जुलकरनैन यांनी आज हा निर्णय दिला आहे.
इम्रान खान रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असून तेथे या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. विशेष न्यायालयाचा हा निर्णय इम्रान खान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे जे अजूनही निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहत होते. 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर या दोघांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे.
इम्रान खान या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकत असले, तरी लष्करासोबत सुरू असलेल्या तणावामुळे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सांगितले की, इम्रान खानचे वकील हजर होत नाहीत आणि त्यांना सरकारी वकील देण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी त्यांचे वकील हजर नसताना त्यांचे म्हणणे कसे नोंदवले, असा सवाल केला. ही सुनावणी कारागृहातच झाली. निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांचे निवडणूक चिन्ह बॅटही त्यांच्या पक्षातून काढून घेण्यात आले होते.
गीझर, रूम हीटर्स, एअर प्युरिफायरवर बंपर ऑफर, 50% पर्यंत सूट
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका
पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये तणाव वाढत आहे. राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांमध्ये याआधीही अनेक संघर्ष झाले आहेत. सोमवारी नाझीमनादमध्ये हिंसक संघर्ष झाला. या चकमकीदरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) कार्यकर्त्यांसोबत झालेल्या गोळीबारात मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम पाकिस्तान) चा एक कार्यकर्ता ठार झाला आणि तीन जण जखमी झाले.
दरम्यान, एक दिवस अगोदर रविवारी, क्लिफ्टन भागात तुरुंगात बंद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या निवडणूक रॅलीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पांगवले. यादरम्यान काही पोलिसांसह किमान 25 जण जखमी झाले. दक्षिणेकडील सिंध प्रांतात, विशेषत: पाकिस्तानचे आर्थिक केंद्र असलेल्या कराचीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे आणि सर्व पक्ष एकमेकांशी जोरदार स्पर्धा करत आहेत. कराची हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा (पीपीपी) बालेकिल्ला मानला जातो.