पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेतमामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक (DD-०१-२-९२०५) अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६०,००० बाटल्या (६०० बॉक्स) एव्हढा मुद्देमाल मिळुन आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल २१ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये जप्त करण्यात आलेली बनावट देशी मद्य तयार केले जात होते. त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जाते. याची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद केला. या कारवाईत आतापर्यंत ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना अटक केली.