पिंपरी – गेल्या एक महिन्यापासून आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार जगताप यांच्या तब्येत ठीक व्हावी, यासाठी अनेकांनी पूजा-अर्चना केली. गुरुवारी (दि. 12) सकाळी ते रूग्णालयात खिडकीत येऊन हात हालवून सर्वांना अभिवादन करत असल्याचा तसेच थम्ब दाखवून आनंद व्यक्त करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला.
यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचेही या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. हाच व्हिडीयो भाजप शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर प्रचंड उत्साह आणि जल्लोष होता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्हिडिओ काढून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या चाहत्यांनी ठिकठिकाणी आमदार जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी होमहवलही केले होते. त्यांची ही प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न आता कामी आले आहेत.
दरम्यान गुरुवारी सकाळी भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक यांना एक व्हिडिओ आला. त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयाच्या खिडकीत येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन करीत असल्याचे दिसून येते. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोषही ऐकू येत आहे. आमदार महेश लांडगे यांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. आमदार जगताप यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार लांडगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. सर्वांची प्रार्थना, सदिच्छा आणि भाऊंची दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळे त्यांनी या संकटावर मात केली आहे. रुग्णालयात नियमित येणारे कार्यकर्ते, हितचिंतकांना हात दाखवून दिलासाही दिला. दवा आणि दुवा कामाला आली, असेच म्हणावे लागेल.