नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक ४ जानेवारीला दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची सज्जता आणि भारत न्याय यात्रा या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते.
कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित बैठक होईल. त्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते सहभागी होतील. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या राजकीय महासंग्रामाला सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटनेच्या सज्जतेची चाचपणी बैठकीत केली जाईल.
इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचा घटक म्हणून कॉंग्रेस निवडणूक लढवेल. त्या आघाडीचे जागावाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे तो मुद्दा बैठकीत चर्चेला येईल. भारत न्याय यात्रा या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रारंभ 14 जानेवारीपासून होणार आहे.
त्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. निवडणुकीच्या तोंडावर यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याची संधी पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे यात्रेवर कॉंग्रेसचा अधिकाधिक फोकस असल्याचे दिसते.