पिंपरी – करोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडे बाजार, मोशी येथील उपबाजार समिती तसेच भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत: प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मंगळवारपर्यंत (दि. 14) ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे. भोसरी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, वाकड येथील भाजी मंडई, सर्व आठवडे बाजार, शहरातील हातगाड्या, मोशीतील उपबाजार समिती तसेच किरकोळ भाजीपाला व फळे विक्री या आदेशानुसार तीन दिवसांसाठी बंद केली आहे.
मंगळवार रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. संबंधित परिसरातील पोलीस स्थानकप्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील. संपूर्ण शहरात कोणतीही भाजी मंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घ्यावी, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात नमूद केले आहे.