अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध
वॉशिंग्टन : महाभियोग चौकशीमुळे हताश झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट संदेशात आपला निषेध व्यक्त केला. पॉम्पिओ यांनी डेमोक्रॅटिक सभागृह समित्यांच्या तीन प्रमुखांवर असा आरोप केला की, ही महाभियोग चौकशी म्हणजे परराष्ट्र खात्यातील लोकांना धमकावण्याचा प्रकार आहे. दरम्यान, या चौकशीमुळे ट्रम्प प्रशासन हे पुर्णपणे हादरून गेले असल्याचे दिसत आहे.
माझ्याविरोधात सुरू करण्यात आलेली महाभियोग चौकशी हा अध्यक्षांविरोधातील बंडाचा भाग आहे, अशा शब्दात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाने सुरू केलेल्या कारवाईचा निषेध केला.
परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी या प्रकरणी परराष्ट्र खात्यातील पाच माजी कर्मचारी व सध्याचे काही कर्मचारी यांचे जाबजबाब घेऊन देण्याच्या डेमोक्रॅटिक चौकशी समितीच्या मागणीला कसून विरोध केला आहे. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांचा मुलगा हंटर बिदेन यांना युक्रेनमधील व्यवहारांच्या प्रकरणात चौकशीच्या सापळ्यात अडकवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेनस्की यांच्यावर फोन करून दबाव आणला होता. बिदेन हे 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार असू शकतात.