सुनीता शिंदे
कराडातील शाळांमध्ये पालिकेच्या ग्रीनी टीमचा उपक्रम
कराड – गत दोन वर्षांपासून स्वच्छतेचा विडा उचललेल्या कराड नगरपालिकेने आता बच्चे कंपनीला केंद्रबिंदू केले आहे. बालमनावर स्वच्छतेचे संस्कार केल्यास पुढे त्याचा फायदा होऊ शकतो हा विचार करून पालिकेची ग्रीनी टीम शहरातील शाळांमधे जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत विविध खेळ खेळून कचरा वर्गीकरणाची माहितीही देत आहेत. हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे मुलांना स्वच्छतेची सवय लागण्यास निश्चितच मदत होईल.
देशात स्वच्छ भारत अभियानास सुरूवात होऊन पाच वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा हा विषय घेवून मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दि. 11 ते 30 सप्टेंबर अखेर पालिकेच्या वतीने शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आला. सर्व मराठी शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये ग्रीनी टिमच्या सदस्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. दररोज शाळांमध्ये भेटी देवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मंगळवार, दि. 1 ऑक्टोबर पासून प्लॅस्टिक बंदी होत असल्याने हा विषय घेऊन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली. तसेच कचऱ्याचे प्रकार विद्यार्थ्यांना कळावे या अनुषंगाने कचरा वर्गीकरणाचा खेळही खेळण्यात आला. विद्यार्थ्यांना आवडेल, रूचेल अशा पद्धतीने हा खेळ खेळला गेल्याने त्यांच्याकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे ग्रीनीच्या सदस्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजल्यास त्यांच्यामार्फत घरोघरी ही माहिती पोहचून स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. तसेच स्वच्छतेबाबत, कचऱ्याचे प्रकार याबबत स्लाईड शोद्वारे माहिती देण्यात आली. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे यश मिळवणाऱ्या कराड पालिकेने विविध उपक्रम राबवित स्वच्छतेत सातत्य ठेवले असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार साड्यांच्या पिशव्या
ग्रीनी टीमने स्वच्छतेची महत्त्व पटवून देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला घरातून वापरात नसलेल्या साड्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या साड्यांपासून पिशव्या तयार करून विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. देशात 1 ऑक्टोबरपासून पूर्णत: प्लॅस्टिक बंदी करण्यात आल्याने कापडी पिशवीची सवय लागावी यासाठी हा अनोखा उपक्रम पालिकेने आखला आहे.
बचतगटाच्या महिलांना मिळणार काम
कराड नगरपालिकेने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना घरातून एक साडी आणण्याचे आवाहन केले आहे. या साड्यांपासून पिशवी बनविण्याचे काम पालिकेच्या बचत गटातील शिलाई काम करणाऱ्या महिलांना मिळणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीबरोबरच महिलांना काम असा दुहेरी फायदा होऊ शकतो.