अनौपचारिक क्षेत्रावरही झाला परिणाम
नवी दिल्ली – सेंटर फोर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत 60 लाख व्हाईट कॉलर रोजगारावर परिणाम झाला आहे.
यामध्ये अभियंते, डॉक्टर, शिक्षक, विश्लेषक, अकाउंटंट्स इत्यादीचा समावेश आहे. आता राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असले तरी स्थानिक पातळीवर हालचालीस बऱ्याच मर्यादा आहेत. याचा विविध सेवा क्षेत्रातील उद्योगावर परिणाम होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्था वाढत होती तेव्हा 2016 पासून व्हाईट कॉलर रोजगार निर्मितीत वाढ झालेली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसल्यामुळे रोजगार निर्मितीवर परिणाम झाला असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. आम्ही संकलित केलेली माहिती विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या रेकॉर्डवरील कर्मचाऱ्यांची आहे.
मात्र, काही लोक स्वतःचा रोजगार निर्माण करतात, त्याची माहिती या आकडेवारीत नाही. या काळात औद्योगिक रोजगारावर त्यातल्या त्यात छोट्या उद्योगातील रोजगारावर परिणाम झालेला आहे.