पुणे -महापालिकेकडून देण्यात आलेल्या पथारी व्यावसायिक परवाना नियमांचे उल्लंघन तसेच अतिक्रमण केल्याने महापालिकेने डेक्कन येथील हॉंगकॉंग लेनमधील 17 गाळे शुक्रवारी दुपारच्या सुमारास सील केले.
अनेक परवानाधारकांनी या ठिकाणी पोटभाडेकरू ठेवले असून काही पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याने ही कारवाई केल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
तसेच, येरवडा येथील पर्णकुटी चौकातील 35 व्यावसायिकांची दुकानेही सील केली. संपूर्ण शहरात ही कारवाई यापुढे नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईवेळी अनेक व्यावसायिकांनी भीतीपोटी अचानक दुकाने बंद केल्याने या भागात काहीकाळ गोंधळाची स्थिती होती. तर, काही व्यावसायिक भीतीपोटी दुकाने सोडून पळून गेल्याचे दिसून आले.
महापालिकेकडून केंद्र शासनाच्या शहर फेरीवाला धोरणाअंतर्गत पथारी व्यावसायिकांना 2015 मध्ये पथारी प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार, व्यावसायिकांना निश्चित करून दिलेली जागा तसेच परवाना इतरांना देता येत नाही.
तसेच, या परवान्यानुसार, तसेच धोरणानुसारच व्यावसाय करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांना आपले परवाने आणि पथारीच भाडेकराराने दिले आहेत. दुकानाबाहेर हे परवाने लावले जात असून आतमधील भाडेकरू आपण कामगार असून संबंधित परवानाधारकाकडे काम करत असल्याचे भासवत आहेत.
याबाबत पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन परवाना तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, हॉंगकॉंग लेनमधील 35 गाळ्यांची तपासणी केली असता 17
पोटभाडेकरू असल्याचे आढळल्याने ही कारवाई केल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले, तसेच यापुढे नियमित तपासणी करून ही कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.