पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील सोनगाव, पिंपळी, मेखळी, झारगडवाडी या गावांत अनेक वर्षांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. याबाबत कारवाईही करण्यात आली मात्र, पोलिसांची पाठ फिरताच हे धंदे पुन्हा बोकळले जातात, त्यामुळे या अवैध धंद्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी या चारही गावांतून
होत आहे.
या गावातील महिला व नागरिकांनी बेकायदेशीर सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांना अनेकवेळा तोंडी आणि लेखी निवेदने दिली आहेत. यात पावडरची ताडी, हातभट्टी, देशी दारू, मटका, जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दारूमुळे तरुणाई व्यसनाधीन झाली असून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
गेल्यावर्षी झारगडवाडी आणि सोनगाव या गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील या गावाला भेटी देऊन याबाबत माहिती घेऊन पोलिसांना अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आदेश दिले होते; मात्र पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपाचे कारवाई होते. आज मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून लोकप्रतिनिधींचा आदेशही पोलीस पाळत नसल्याचे ग्रामस्थांचे
म्हणणे आहे.
“ते’ पोलिसांना माहिती देत नाहीत का?
झारगडवाडी, सोनगाव, पिंपळी मेखळी गावात आणि ढाब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून केमिकल पावडर ताडी, हातभट्टी, देशी दारूचे तुकडे विकण्याचे आणि मटका, जुगार खेळण्याचा डाव राजरोसपणे सुरू आहेत. असे असताना गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, हे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना देत नाहीत का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.