नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. तसेच त्यांना उद्या, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेने देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. हेमंत सोरेन यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल 1 हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना संथल परगनामधील दगड आणि वाळू उत्खननातून येणारा निधी प्रेम प्रकाश यांना द्यायला सांगितला होता. या बदल्यात प्रकाश व्यापाऱ्यांकडे पैसे सुपुर्द करायचे, असे ईडी चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी खजीनदार रवी केजरीवाल यांनी सांगितले. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणीच्या कथित घटनांशी संबंधित प्रकरणात झारखंडमधील साहिबगंज, बरहैत, राजमहल, मिर्झा चौकी आणि बरहरवा येथील 19 ठिकाणी ईडीने मिश्रा आणि त्याच्या कथित साथीदारांवर 8 जुलै रोजी छापे टाकल्यानंतर ईडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ईडीने पंकज मिश्रा आणि अन्य दोघांना अटक केली आहे.