रांची – झारखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी सुमारे 7 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीच्या टीमने सीएम हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. यानंतर हेमंत सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
दरम्यान, झारखंडमधील सत्ताधारी पक्षाचे आमदार राजभवनात पोहोचले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांनी चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड केली आहे. अशा परिस्थितीत चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात. ईडीच्या टीमने हेमंत सोरेन यांची सीएम हाऊसमध्ये सुमारे 7 तास चौकशी केली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर सीएम निवास, राजभवन, भाजप कार्यालयासह रांचीच्या विविध भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ईडीचे पथक उत्तराने समाधानी नव्हते –
आतापर्यंतच्या चौकशीत हेमंत सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकारी समाधानी नाहीत. हेमंत सोरेन यांनी आतापर्यंतच्या चौकशीत फक्त होय आणि नाही असे उत्तर दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांना 40 हून अधिक प्रश्न विचारले आहेत. अनेक प्रश्न ऐकून हेमंत सोरेन ईडीच्या अधिकाऱ्यांवर संतापले. दरम्यान, रांचीच्या अनेक भागात कलम 144 लागू आहे. सीएम हाऊसबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
चंपई सोरेन होतील झारखंडचे नवे मुख्यमंत्री –
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा जोरात सुरु आहे. कल्पना सोरेन यांच्याशिवाय चंपई सोरेन यांनाही मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आहे. तथापि, JMM देखील प्लॅन बी वर काम करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅन बी मध्ये झारखंडमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील.