लोणावळा, (वार्ताहर) – टाकवे खुर्द (ता. मावळ) या गावात 2004 साली एका घरावर दरोडा पडला होता. या दरोड्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालातील साडे नऊ तोळे सोने तब्बल 20 वर्षांनी मूळ मालकाला परत मिळाले. या दरोड्यातील दरोडेखोरांचा शोध घेऊन, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करून त्यांना शिक्षेपर्यंत पोचविण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलिसांना मात्र हे सोने मूळ मालकाला परत करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार 2004 साली टाकवे गावात पोपट शंकर झावरे यांच्या घरावर दरोडा पडला होता. या दरोड्यात झावरे यांच्या घरातील साडे नऊ तोळे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दरोड्यात सामील असलेल्यांना जेरबंद करीत वरील मुद्देमाल हस्तगत केला होता.
2006 साली न्यायालयाने दरोड्यातील सात आरोपींना 7 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तसेच चोरीचा मुद्देमाल फिर्यादीला अर्थात मूळ मालक म्हणजे पोपट शंकर झावरे यांना परत करण्याचे आदेश दिले होते.
घर बदलल्यामुळे झाली पोलिसांची अडचण
दरोड्यानंतर झावरे हे राहाते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊनही ते मिळून येत नव्हते. तरीही सोने परत करण्यासाठी पोलिसांकडून झावरे यांचा शोध सुरू होता.
अखेर २० वर्षांनी पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे, पोलीस हवालदार सकपाळ यांनी टाकवे खुर्दच्या पोलीस पाटलांच्या मदतीने पोपट झावरे यांचा नवीन पत्ता शोधून काढला. सध्या तळेगाव येथे राहणाऱ्या झावरे यांना पोलीस स्टेशनला बोलावून सर्व मुद्देमाल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
असे होते चोरीला गेलेले दागिने
झावरे यांना परत करण्यात आलेल्या मुद्देमालात अर्धा तोळा वजनाचे कानातील सोन्याची दोन फुले, सोन्याचे दोन तोळयाचे गळयातील नेकलेस, ५ ग्राम वजनाचे काळया मन्यातील मंगळसुत्र, १५ ग्राम वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठन, एक तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र काळया मन्यात गुंफलेले आणि दोन तोळे वजनाचे वजनाचे मनी मंगळसुत्र दोन वाटया व सोन्याचे मनी मंगळसूत्र याचा समावेश आहे.