लोणावळा, (वार्ताहर) – ग. दी. माडगूळकर यांच्या शब्दस्वरांनी नटलेले व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले काव्यरूप गीतरामायण हा कार्यक्रम लोणावळा शहरातील भांगरवाडी राम मंदिराच्या आवारात पार पडला. सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांनी रामचारित्राचे त्यांच्या ओघवत्या भाषेत केलेले निरूपण आणि जोडीला वर्षोनुवर्षे मराठी मनावर राज्य करणाऱ्या गीत रामायणातील गीतांची संगत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या शेकडो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेली.
भांगरवाडीतील १०० वर्षांहून अधिक जून्या राममंदीराचा जीर्णोद्धार करण्यात आला. येत्या 26 एप्रिल रोजी मंदिराचे कलशारोहन संपन्न होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रामनवमी पासून याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदीर ट्रस्ट भांगरवाडी व वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गीत रामायण हा सुगम संगीताचा कार्यक्रम सर्वप्रथम १९५५ साली पुणे आकाशवाणी वर प्रसारित झाला. तेव्हापासून गीत रामायणाचे अढळ स्थान आहे.
केवळ दगडावर दगड रचून उभी राहणारी वास्तू म्हणजे मंदिर नव्हे; संस्कारांचा वस्तुपाठ, मानदंड म्हणजे मंदिर. ज्यादिवशी अहंकार सुटतो आणि सहंकार सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने रामराज्य सुरू होते अशाप्रकारे मनाचा ठाव घेणाऱ्या शब्दात गीत रामायणाचे निरूपण करणाऱ्या सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक,
सोबतीला नचिकेत देसाई, धनंजय म्हसकर, सृष्टी कुलकर्णी, केतकी भावे जोशी यांचे सुरेल गायन आणि वाद्यवृंदावर साथ देणारे संगीत संयोजक महेश खानोलकर, निरंजन लेले, प्रशांत लळीत, सागर साठे, निशांत करलगीकर, हनुमंत रावडे, सूर्यकांत सुर्वे या सर्वांच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांचे अंतःकरण जिंकून घेतले.