ओढ्या, नाल्यावर अतिक्रमणाचा बांध

शेतकरी, प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांकडून नैसर्गिक मार्ग गिळंकृत

थेऊर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागांमधील काही शेतकऱ्यांनी व प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांनी शासकीय ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने ओढे नाल्यांना पूर आला आहे. मात्र, ओढे नाल्यांचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळेच मानवनिर्मित आपत्तीमुळे काही ठिकाणी लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने शेतीचीही वाताहात झाली आहे.

कोलवडी, केसनंद, मांजरी खुर्द, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, नायगाव, पेठ, सोरतापवाडी या भागातील सरकारी ओढ्यांना अतिक्रमणाचा विळखा घातलेला आहे. गुंठेवारीमध्ये एका गुंठ्याला सात ते आठ लाख रुपये भाव मिळत असल्याने डेव्हलपर्सची वक्रदृष्टी शासकीय ओढे, नाले व कॅनालचे पाट यावर पडल्याने पूरपरिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गाव नकाशातील जुने ओढे, नाले पूर्ववत करण्याची मागणी कोलवडी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब गायकवाड यांनी केली आहे.

कोलवडी, केसनंद गावच्या शिवेवरील सरकारी ओढ्यांवर प्लॉटिंगधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले आहे. कोलवडी येथे चुकीच्या कारभारामुळे मोठा फटका बसला आहे. येथील गटातील पिके अजूनही पाण्यात बुडाल्याने शेतकरी भाऊसाहेब गायकवाड व इतरांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच तलाठी जी. डी. शेख यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पंचनामा सादर केला आहे. आता यावर कार्यवाही गरजेची आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.