किवळे, (वार्ताहर) – नदी उशाला अन् कोरड घशाला हे म्हणणे अत्यंत रास्त ठरावे अशी अवस्था मामुर्डीकरांची झाली आहे. नदी किनारी गाव आहे पण पाणीपुरवठा करणारे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा दोन आस्थापना आहेत. त्यामुळे कधी पाणी मिळते तर कधी दोन दिवस पाण्याची वाट पाहावी लागते.
मामुर्डीची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे शेवटचे टोक असल्याने या ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. मध्यंतरीच्या काळात नवीन जलवाहिन्या टाकल्या. मात्र तरीही पाणीपुरवठ्यात फरक पडला नाही.
निम्मे मामुर्डी शहर देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये असून उर्वरित भाग शहर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. ज्या भागात महापालिका आहे त्या भागात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता कॅन्टोमेंट बोर्डाचा सर्वच भाग सरसकट महापालिकेत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो.
आम्ही गावात राहत असून आम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पाणीपुरवठा होतो. पाणी कमी अधिक दाबाने मिळते.
– प्रकाश गायकवाड (नागरिक )
आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून पाणीपुरवठा केला जातो. दिवसाआड पाणी येते पण ते मुबलक प्रमाणात असते.
– बाळासाहेब धावारे (शिक्षक)