कोरेगाव भीमा, (वार्ताहर)- आठवडा बाजारातून मुलांना व्यवहार ज्ञान यावे, यासाठी असे स्तुत्य उपक्रम होणे गरजेचे आहे, असे मत आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. डींग्रजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरविला होता. आमदार पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, डिंग्रजवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुलांनी भरवलेल्या आठवडे बाजारामुळे मुलांमध्ये बालवयातच व्यवहार ज्ञान येणार आहे. मुलांच्या या उपक्रमाचा शिरूर तालुक्यातील इतर शाळांनी आदर्श घेत असा उपक्रम आपल्या शाळेत घेतला पाहिजे.
यावेळी लहान मुलांनी बाजारात भाज्या, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी सरपंच यशवंत गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शामराव गव्हाणे, माजी उपसरपंच बापूसाहेब मल्हारी गव्हाणे, सोसायटी संचालक प्रवीण गव्हाणे, माजी चेअरमन संभाजी पाटीलबुवा गव्हाणे, शिक्षण तज्ज्ञ विशाल गव्हाणे, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी केले. महेश गायकवाड यांनी आभार मानले.