नवी दिल्ली : तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानामध्ये घुसखोरी करत त्याठिकाण सत्ता काबीज केली. १५ ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतले आणि मुल्ला मोहम्मद हसन अखुंड याच्या नेतृत्वाखाली कट्टर अंतरिम सरकारची घोषणा केली. तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्लाह अखुंदजादा यांनी १५ ऑगस्टला राजधानी काबूलवर बंडखोरांच्या ताब्यात आल्यानंतरच्या पहिल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे की “भविष्यात, अफगाणिस्तानमधील शासन आणि जीवनातील सर्व बाबी पवित्र शरियतच्या कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातील,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
तालिबानच्या प्रकरणावरूनच आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतलेल्या तालिबानने खरे शरिया (इस्लामिक कायदा) पाळले पाहिजे, जे महिलांसह सर्वांच्या हक्कांची हमी देते”, असे जम्मू -काश्मीरच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी सांगितले.
“तालिबान हे वास्तव म्हणून समोर आले आहे. सत्तेत पहिल्यांदा त्याची प्रतिमा मानवाधिकारविरोधी होती. जर त्याला अफगाणिस्तानवर राज्य करायचे असेल तर त्याला कुराणात सांगितल्याप्रमाणे खऱ्या शरिया कायद्याचे पालन करावे लागेल जो महिला, मुले आणि वृद्धांच्या हक्कांची हमी देतो”, असे मुफ्ती म्हणाल्या.
“जर तालिबानने मदिनामध्ये पैगंबर मुहम्मद यांनी केलेल्या प्रशासनाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले तर ते जगासाठी एक उदाहरण ठरेल”, असे जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, जर तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायासोबत व्यवसाय करायचा असेल तर इस्लाम आणि शरियाचे कट्टर अर्थ लावणे टाळावे. जर तसे झाले नाही तर ते अफगाणिस्तानच्या लोकांसाठी किचकट होऊन बसेल.