पुणे -शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या, तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, आगामी 24 तासांत पुण्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिन छत्तीसगड भागात तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
मात्र, येत्या 24 तासांत पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. पुण्यात येत्या 24 तासांत घाट माथ्यावर मध्यम स्वरुपात तर शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडतील मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल,
असा अंदाज विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.8) दिवसभर शहर परिसरात हलक्या सरींनी हजेरी लावली. मध्येच पडणारी जोराची सर आणि त्यानंतर पडणारे ऊन अशा मिश्र वतावरणामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती.