हजेरी कमी असल्यास परीक्षेला बसता येणार नाही

पुणे – माध्यमिक शाळांमध्ये 75 टक्के हजेरी नसलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

राज्य मंडळाच्या नियमावलीनुसार नियमित विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय सत्रातील हजेरी स्वतंत्रपणे 75 टक्के असणे आवश्‍यक आहे. प्रथम सत्रातील हजेरी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु झाल्यापासून 15 ऑक्‍टोबरपर्यंत व द्वितीय सत्रातील हजेरी ही 16 ऑक्‍टोबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत विचारात घ्यावयाची आहे.

विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी भरत असल्यास त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या विद्यार्थ्यांना नो कॅन्डीडेट करण्याचे प्रस्ताव मंडळाकडे सादर करणे आवश्‍यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेश पत्रे न देता ती विभागीय मंडळाकडे त्वरीत जमा करावीत , अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.