हजेरी कमी असल्यास परीक्षेला बसता येणार नाही

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम : परीक्षा अर्ज रद्द होण्याची शक्‍यता

पुणे – माध्यमिक शाळांमध्ये 75 टक्के हजेरी नसलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

राज्य मंडळाच्या नियमावलीनुसार नियमित विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय सत्रातील हजेरी स्वतंत्रपणे 75 टक्के असणे आवश्‍यक आहे. प्रथम सत्रातील हजेरी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु झाल्यापासून 15 ऑक्‍टोबरपर्यंत व द्वितीय सत्रातील हजेरी ही 16 ऑक्‍टोबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत विचारात घ्यावयाची आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी भरत असल्यास त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या विद्यार्थ्यांना नो कॅन्डीडेट करण्याचे प्रस्ताव मंडळाकडे सादर करणे आवश्‍यक आहे.

संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेश पत्रे न देता ती विभागीय मंडळाकडे त्वरीत जमा करावीत , अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत.

वैद्यकीय अथवा अन्य समर्थनीय कारणाने 60 टक्के पेक्षा जास्त, परंतू 75 टक्के पेक्षा कमी हजेरी असल्यास अशा विद्यार्थ्यांची हजेरी क्षमापित करण्याचे प्रस्ताव योग्य पूराव्यासह मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देण्यात येऊ नये. अपात्र विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांवरच राहणार आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास दंडात्मक शुल्क आकारण्यात येणार आहे, असेही सचिवांनी पाठविलेल्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here