पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला. या पार्श्वभूमीवर पुढच्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असून तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे दिले होते. त्यानुसार आज नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत पत्र जाहीर करत ही माहिती दिली आहे. यानुसार, २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. तसेच, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
याशिवाय इतर परीक्षा निश्चित वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तर ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अवघ्या तीन दिवसांवर होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नवी पेठ येथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला. “एमपीएससी’च्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल पाचव्यांदा विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रहाची मागणी करीत उमेदवारांनी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे तीन हजार उमेदवारांच्या उपस्थितीत झालेले आंदोलनाने राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.
यानंतर पुढच्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असून, त्याची तारीख जाहीर होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाने उमेदवारांची झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.