पिंपरी – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचे आर्थिक, निविदा प्रक्रिया व बिले अदा करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पवार यांचे अधिकार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे तर, रॉय यांचे अधिकार सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत, ही कारवाई आयुक्त राजेश पाटील यांनी केली आहे.
वायसीएम रूग्णालयास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गॅप एन्टरप्रायजेस या कंपनीला वाढीव दराने बिले दिल्याप्रकरणी आणि कोविड केअर सेंटरला नियमबाह्य पद्धतीने बिले अदा केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त पवार तसेच, डॉ. रॉय यांच्यावर मंगळवारी (दि.9) झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोप केले.
या प्रकरणी संतापलेल्या महापौर माई ढोरे यांनी दोघांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे अधिकार काढून घेण्याचे आदेश आयुक्त पाटील यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.