सातारा – “मी मिशा काढीन किंवा मी भुवया काढीन’ असे हे डायलॉग उदयनराजे यांचे नेहमीचेच आहेत. आपण जर इतके महाविकास पुरुष होतात तर साताऱ्यातील नागरिकांनी आपल्याला का नाकारले, असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्युत्तरादाखल केला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात विविध विकास कामांचे नारळ फोडले. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांनी अशा व्यक्ती राजघराण्यात का जन्माला येतात, अशी सडकून टीका केली होती.
गेले दोन दिवस सुरू झालेला दोन्ही नेत्यांमधला कलगीतुरा संपायला तयार नाही. उदयनराजेंच्या आरोपाला उत्तर देताना त्यांच्या “समोरासमोर या’ आव्हानाची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खिल्ली उडवली आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”सातारा विकास आघाडीचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी गेल्या पाच वर्षात उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. विरोधी आघाडी म्हणून आमची नगर विकास आघाडी पालिकेत सक्रिय होती. मात्र, आम्ही काही बोलण्याच्या आधीच सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांमधीलच भांडणे चव्हाट्यावर येत होती. तुझा चेक कितीचा, माझा चेक कितीचा, तुला किती कमिशन मिळाले, मला किती कमिशन मिळाले हा कलगी तुरा साताऱ्याने पाहिला असून हे मी बोलत नाही. हे यापूर्वीच वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आहे.”
मी भुवया काढील मी मिशा काढील, समोरासमोर या हे उदयनराजेंचे नेहमीचेच डायलॉग आहेत सातारकरांना याची सवय झाली आहे. प्रत्यक्षात ते त्यांचा शब्द कधीच पाळत नाहीत. जर आपण इतके महाविकास पुरुष होता तर सातारकरांनी आपल्याला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत का नाकारले याचे उत्तर मात्र मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना असा कीे पाणी योजना असो. कोणतीही योजनाही पूर्ण झालेली नाही. यामध्ये स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देण्यामुळेच विकासाचे गाडे पुढे सरकलेले नाही. घंटागाडी निविदा प्रकरणामध्ये वेतनाची ओढाताण झाल्यामुळे घंटागाडी चालक आत्महत्या करायला निघाले होते हे सुद्धा सातारकरांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे जर आव्हान दिले तर ते नक्कीच पाळावे, असा प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना लगावला आहे.