हडपसर : खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा.त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या वतीने हांडेवाडी रोड येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप लांडे, शरद सोनवणे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त विलास कानडे,कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे , संतोष भानगिरे, बाळासाहेब भानगिरे ,अभिमन्यू भानगिरे आदीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे सरकार आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरसेवक नाना भानगिरे यांचे कौतुक करताना सांगितले की हा जरा वेगळा माणूस आहे. त्याने माझ्या प्रेमापोटी माझे नाव उद्यानाला दिले असावे. मात्र आता ते बदलून उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे साहेब असे नाव देण्यात आले आहे. लोकहिताची कामे केल्यामुळेच तीन वेळा नाना नगरसेवक झाला. स्वताच्या खिशात हात घालून जनतेच्या उपयोगी पडण्याचे काम नगरसेवक नाना भानगिरे करत आहे. असेच काम करत मी आज इथपर्यंत पोहचलो आहे.
शेवटपर्यंत शिंदे साहेबांचा कट्टर समर्थक म्हणून राहीन- नाना भानगिरे
स्वखर्चाने उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे नाव दिले याबद्दल दिलगिरी व्यक्त करून अधिक बोलताना नाना भानगिरे म्हणाले की मला कोणत्याही पदाची लालसा नाही. माझ्या प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी साहेबांनी मला निधी उपलब्ध करून दिला. तत्काळ मदत केली म्हणून येथील पाणी प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे मरेपर्यंत शिंदे समर्थक म्हणून काम करेन. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्या महंमदवाडी गावचे नाव बदलून ते महादेववाडी करावे, तसेच पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी ही यावेळी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मैदानाच्या उभारणीमध्ये काम केलेले कंत्राटदार, मनपा अभियंते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.