पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सरहद पुणे, भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाॅन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाॅर मेमोरियल ते कारगील वाॅर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे.
त्यासंबंधी स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या वेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
झोजिला युद्ध विजय अमृतमहोत्सव आणि कारगिल युद्ध विजय रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्याथाॅन- २०२४(मॅरोथाॅन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतासह जगातील विविध देशांतील धावपटू भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
गेल्या सहा वर्षांपासून सरहदच्या वतीने कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगील येथे केले जात आहे. त्यासाठी भारतीय लष्कराने सरहद संस्थेला या स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी, २५ किमी, १० आणि ७.५ किमी आणि अंतराच्या स्पर्धा, तसेच शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमीची स्पर्धा घेतली जाईल आणि या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
या वेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य समन्वयक डॉ. शैलेश पगारीया, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, तांत्रिक संचालक वसंत गोखले, सरहदचे सुयोग गुंदेचा, रामदास खोपडे, अजित निबांळकर, संतोष बालवडकर, स्वयंम पगारीया उपस्थित होते.
www.sarhadkargilmarathon.com या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख मुख्यालय) हे आहेत.