मुंबई – मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून लिहलेले पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेले उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विशाखा राऊत म्हणाल्या कि, अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाही. त्या फक्त माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकले असते. पण, अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
तुमचे पती जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तुम्ही राजकारणात दिसायला लागल्यात. शिवसेना ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी ही राजकारणामध्ये आहे. त्यामुळे आम्ही काय करावे, हे आम्हाला शिकवू नये, आम्हाला संस्कृती आहे. त्यामुळे आम्हाला बोलायला भाग पाडू नये, जर बोलायचे असेल तर आमच्या महिला आघाडी समोर येऊन बोलून दाखवावे, असे आव्हानाच विशाखा राऊत यांनी अमृता यांना दिले आहे.
दरम्यान, कोश्यारी-ठाकरे वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहेत का? नियमावली लागू करण्यात काही जण असमर्थ ठरतात, त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.