कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – राजकीय वरदहस्ताने परिसरातील पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं वाढली आहेत. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांची कार्यालयांसह अनेकांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच पदपथावर “दुकानं’ मांडण्यास बेकायदा परवानगी दिल्याने त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर “प्रेशर’ टाकला जात आहे. त्यामुळे पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई म्हणजे अधिकाऱ्यांसाठी “अग्निपथ’ ठरू लागले आहेत.
महानगरपालिकेकडून रस्ता बांधणी तसेच दुरुस्तीकरिता मोठा निधी खर्च केला जात असताना पदपथ तयार करणे, सुशोभिकरण करणे अशा कामांवरही खर्च केला जातो; परंतु उपनगरांतील पदपथ हे सध्या चालण्याऐवजी इतर कारणांसाठीच उपयोगात आणली जात आहेत. यात भरीस भर म्हणून आता राजकीय नेत्यांची कार्यालये पदपथावर उभी राहू लागली आहेत. बिबवेवाडी परिसरात तर अशी कार्यालये उभारण्याची स्पर्धाच सर्व राजकीय पक्षांत सुरू झाली आहे.
ग्रंथालय-वाचनालय, ई-सेवा केंद्र, पाणपोई, विरंगुळा केंद्र इतकेच काय तर संपर्क कार्यालयेही पदपथावर थाटली जात असल्याने पदपथ नागरिकांना चालण्यासाठी की नेतेमंडळींच्या सोयीसाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच भरीस भर म्हणून पक्षश्रेष्ठींच्या “आशीर्वादा’ने पदाधिकारी, कार्यकर्तेही आपली दुकानं पदपथावर थाटत आहेत.
काहींनी तर पक्की बांधकामे करून पदपथांचा ताबा घेतला आहे. आपल्या भागात आपले कसे वर्चस्व आहे, हे या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पदपथावर थाटण्यात आलेल्या कामांवर “माननीयां’ची नावे लिहिलेली असतात. एका पक्षाने अतिक्रमण केले की दुसरा पक्षही याची तयारी करतो. यातून पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बांधण्याची जणू काही राजकीय स्पर्धाच लागली आहे की काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याने अधिकाऱ्यांकडूनही याकामी नरमाईची भूमिका घेतली जात आहे.
लोकप्रतिनिधीच पदपथांवर अतिक्रमण केले तर नागरिकांनी जायचे कोणाकडे? संबंधित गैरप्रकार तातडीने थांबवून कायदेशीर कारवाई करावी याबाबत लेखी तक्रार बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने यांच्याकडे केली आहे.
– विशाल शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुुणे अध्यक्ष
पदपथावरील अतिक्रमणाबाबत तक्रार कार्यालयात आली असून संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेत आहे. माहिती घेऊन संबंधित विभागांना पुढील कार्यवाही करण्यास सांगण्यात येईल.
– गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
या परिसरात दहा वर्षांपासून माझी जागा होती म्हणून येथे बांधकाम केले. भविष्यात येथे नागरिकांसाठी वाचनालय सुरू करणार आहे, महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी मिळाली नसून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– नितीन बेलदरे, स्वीकृत सदस्य, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय