नवी दिल्ली – करोनावरील औषधाच्या गोळ्या मोलनुपिरावीरच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनेने (आयसीएमआर) शंका उपस्थित केली आहे. या गोळ्यांच्या वापराला अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन आणि भारतातील औषध नियामकांनी मान्यता दिली असली तरी आयसीएमआरने त्याच्या लाभापेक्षा धोके अधिक असल्याने या अँटीव्हायरल औषधांचा समावेश आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या उपचार आचारसंहितेत केला नाही.
अमेरिकेच्या अन्न औषध प्रशासनाने त्याला परवानगी देताना अन्य उपचार मिळत नसतील अथवा त्याचा उपयोग होत नसेल तर या गोळ्यांचा वापर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्याच वेळी एफडीएने फायझरच्या पॅक्सलोविड (सध्या भारतात उपलब्ध नाहीत) गोळ्यांच्या वापराला 12 वर्षांच्यावर मान्यता दिली आहे. या गोळ्यांची शिफारस करताना जागतिक साथीच्या विरोधातील महत्वाचे साधन म्हणून त्याचा गौरव केला आहे.
मोलनुपिरावीर ही गोळी रुग्णालयात दाखल करण्याजोग्या किंवा मृत्यूचे भय असणाऱ्या रुग्णांना देण्यास एफडीएने सुचवले आहे. रुग्णांनी पाच दिवस दिवसातून दोनदा एक गोळी घ्यायची आहे. या औषधाने गर्भावर आणि पेशींच्या अनुवंशीक जनुकीय संरचनेवर परिणाम होऊ शकतो. तसेच कार्टीलेजची हानी करू शकते तसेच स्नायूंनाही नुकसान पोहोचू शकते, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
या गोळ्यांचा वापर करणाऱ्या कोणालाही तीन महिने गर्भधारणा करता येणार नाही. कारण, त्याच्या गर्भाची हानी होऊ शकते, त्यामुळे आचारसंहितेतील उपचरात त्याचा समावेश केला नाही.
या गोळ्यांचा वापर हितावह नसल्याचे सांगून फ्रान्समध्ये या गोळ्यांच्या वापराला परवानगी देणारा आदेश रद्द करण्यात आला आहे. सुरवातीला या गोळ्यांचा वापर केल्याने रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता 50 टक्के कमी होते असा दावा करण्यात आला होता. नंतर ही शक्यता 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. मर्कस् या कंपनीने या गोळ्यांचे उत्पादन केले आहे.