ऑकलंड – इंग्लंडच्या महिला संघाने येथे सुरु असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच विजयाची नोंद केली. या स्पर्धेतील साखळी फेरीचे पहिले तीनही सामने इंग्लंडने गमावले होते. शार्लेट डेनने केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने भारतीय महिला संघावर 4 विकेट्स राखून विजय मिळवताना बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. दुसरीकडे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशांना धक्का लागला असून पुढील सर्व साखळी सामने जिंकले तरीही भारतीय संघाला अन्य संघाच्या यशापयशावरचे गणित पाहावे लागणार आहे.
इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने नाणेफेक जिंकत प्रथम भारतीय संघाला फलंदाजी दिली. स्टार फलंदाज स्मृती मानधनाने 35 धावांची खेळी केली मात्र, सोफीया एक्केलस्टोनच्या चेंडूवर ती बाद झाली. ती बाद झाल्यावर भारतीय संघाच्या फलंदाजीची वाताहत झाली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात मानधनाने शतकी खेळी केली होती. या सामन्यात मात्र, ती मोठी खेळी करु शकली नाही. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धच शतक साकार करणारी हरमनप्रीत कौरही 14 धावा काढून परतली.
यावेळी भारतीय संघ शंभरी तरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, रिचा घोषने 33, तर झुलन गोस्वामीने 20 धावांची खेळी करत संघाला किमान समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. इंग्लंडकडून शार्लेट डेनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ऍना श्रुबसोलने 2 विकेट्स घेतल्या. विजयासाठी आवश्यक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 32 व्या षटकांत 6 गडी गमावून 136 धावा केल्या व यंदाच्या स्पर्धेतील पहिलाच विजय मिळवला.
भारताकडून मेघना सिंगने 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या डावाची सरुवातही खराब झाली. 2 बाद 4 अशा बिकट स्थितीनंतर कर्णधार हेदर नाईटने 72 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची खेळी केली. तीला नताली सीवरने 45 धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. सोफिया डंक्लेने 17 तर एमी एलन जोन्सने 10 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला विजय प्राप्त करुन दिला. भारतीय फलंदाजीला खिंडार पाडणाऱ्या शार्लेट डेन सामन्याची मानकरी ठरली.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 36.2 षटकांत सर्वबाद 134 धावा. (स्मृती मानधना 35, रिचा घोष 33, झुलन गोस्वामी 20, शार्लेट डेन 4-23, ऍना श्रुबसोल 2-20). इंग्लंड – 31.2 षटकांत 6 बाद 136 धावा. (हेदर नाईट नाबाद 53, नताली सीवर 45, मेघना सिंग 3-26).