निधी चौधरींवर कारवाई करा ! पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी

मुंबई – मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधींजींबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून त्यांच्या निलंबनाचीही मागणी होत आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट देखील केली आहे.

ट्विटरवर शरद पवार यांनी म्हटले आहे की, “मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्‍याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे.”

पुढे त्यांनी म्हटले आहे की, “शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी”.

दरम्यान, वादग्रस्त ट्विट केल्यानंतर ते डिलीट करून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी आपली बाजू सावरण्याचाही प्रयत्न केला. 17 मे रोजी निधी चौधरी या आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये निधी चौधरी यांनी, ‘महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती उस्तवाबाबतच्या तयारीबाबत नाराजी व्यक्त करतानाच आपण गांधीजींचे चालनावरील छायाचित्र हटवावे, तसेच त्यांचे जगभरातील पुतळे देखील हटवावेत आणि त्यांचे नाव देण्यात आलेल्या संस्था आणि रस्ते यावरूनही त्यांचे नाव हटवण्यात यावे.’ अशी इच्छा व्यक्त केली होती. निधी यांनी आपल्या ट्विटच्या अखेरीस गांधींची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे याचे आभार देखील मानले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.