दुष्काळाच्या तीव्रतेने बाजारपेठेत शुकशुकाट; डाळीचे भाव कडाडले, पशुखाद्यही महागले

धान्याची आवक बंद : परराज्यातील गहू व बाजरी ठरतोय पर्याय

प्रल्हाद एडके,नगर: राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात पडलेल्या तीव्र दुष्काळाने यावर्षी शेतकऱ्यांचे शेतीचे गणित पुर्णपणे बिघडले. शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना खाद्यान्न पिकवण्यात अपयश आले. याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. या दुष्काळाच्या तीव्रतेने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या कतरतेमुळे खाद्यान्न पिके घेतली नाहीत. त्यामुळे आता बाजारपेठेत नविन मालाची आवक पुर्णपणे बंद झाली आहे. सध्या बाजारपेठेत मध्यप्रदेशहून येणारा गहू व गुजरातहून येणारी बाजरी यावरच उलाढाल चालू आहे. याच परराज्यातून येणाऱ्या अन्नधान्यावरच आता नगरकरांची भिस्त आहे.

गेल्यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे अन्नधान्याचे उत्पन्न घटले. गहू, ज्वारी, बाजरी या खाद्यान्न पिकाचे क्षेत्र घटले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी उत्पन्न झालेले धान्याची बाजारपेठेत विक्री न करता वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा करण्यावर भर दिला. बाजारपेठेत नविन धान्याची आवक पुर्णपणे बंद झाली आहे. यामुळेच सुजलाम सुफलाम असलेल्या महाराष्ट्राला दुसऱ्या राज्यातून गहू व बाजरीची आवक करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध धान्यसाठ्याचेही दर 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटलने वाढल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

जनावरांचा हिरवा चारा संपल्याने सर्वच पशुपालकांनी आपला मोर्चा आता सरकी व पेंड या चाऱ्याकडे वळवल्याने त्यांचे दरही वाढले आहेत. त्यातच चारा छावण्यामुळेही सरकी व पेंडीचा तुटवडा भासत आहे. सरकी पेंड व पापडी पेंडच्या किमतीतही 300 ते 500 रुपयापर्यंत वाढ झाल्याने पशुपालक मेटाकुटीला आले आहेत.


डाळींच्या दरात वाढ

हरबरा डाळ, तुरडाळ, मूग डाळ, मटडाळ, मसुरडाळ या सर्व डाळींच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक डाळीचे दर किलोमागे 5 रुपयांनी वाढले आहेत.


बाजारपेठेत सुमारे एक महिन्यापासून नविन मालाची आवक पुर्णपणे बंद झाली आहे. केवळ मध्यप्रदेशहून येणारा गहू व गुजरातहून येणाऱ्या बाजरीमुळे बाजारपेठेत उलाढाल सुरु आहे.
– मनसुकलाल कोठारी, व्यापारी.


जनावरांच्या खाद्यांची मागणी वाढली आहे. चारा छावण्यांसाठी सरकी व पेंडीची विक्री वाढली आहे. मागणी वाढल्याने जनावरांची खाद्यान्नाच्या किंमती वाढल्या आहेत.
– हेमराज बाबूलाल मुनोत, व्यापारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.