नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काही बदल करण्याची मागणी करणारे एक पत्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांन हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. या पत्रानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलवण्यात आली. ही बैठक सध्या सुरू असून, सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकारी समितीकडे केली आहे. याविषयीची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Sonia Gandhi asks CWC to relieve her as interim party chief, ex-PM Manmohan Singh urges her to continue:Sources
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2020
काँग्रेसच्या नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र देत पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ व सक्रिय नेतृत्वाची निवड करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पक्षातील इतर मुद्यांकडेही लक्ष वेधले होतं. या पत्रानं काँग्रेस नेतृत्वाचा प्रश्न प्रकर्षानं मांडण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक होत आहे.
बैठकीच्या सुरूवातीलाच सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारे पत्र कार्यसमितीकडे दिले. त्याचबरोबर “आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं”, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचे नेतृत्व करत राहावे, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली.
अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही काँग्रेस नेत्यांना केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱ्या नेत्यांना फटकारले आहे. सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधी यांनी नेत्यांना सुनावले आहे. सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी नेत्यांची कानउघडणी केली.