पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 18 वर्षीय तरूणाला सत्र न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी 30 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, न्यायालयाच्या सुनावणीच्या प्रत्येक तारखेस हजर राहणे, या आणि इतर अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला.
सचिन ऊर्फ गंगाधर अभिमान तुपसमुद्रे असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. तुषार चव्हाण, ऍड. अजिंक्य खैरे आणि ऍड. विवेक शिंदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तिच्या वडिलांनी मुलीला फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. सचिन आणि पीडितीचे प्रेमसंबंध होते.
मात्र, हे तिच्या घरच्यांना मान्य नव्हते. दोघात बाणेर येथील एका लॉजवर शारीरिक संबंध आले होते. तीने हातावर मुलाच्या नावाचा टॅटू काढला होता. त्यावेळी तिला आई खवळली होती. त्यानंतर ती सचिन याच्या परभणी जिल्ह्यातील गावी गेली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बचाव पक्षाने जामिनासाठी अर्ज केला होता. तपास पूर्ण झाला आहे.
तिचे त्याच्यावर प्रेम असून, ती 16 वर्षाची आहे. तिला चांगली समज आहे. ती संमतीने त्याच्याबरोबर गेली होती. तुपसमुद्रे 18 वर्षाचा आहे. त्याच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. तुषार चव्हाण, ऍड. अजिंक्य खैरे आणि ऍड. विवेक शिंदे यांनी केली होती.