पिंपरी -पंडित बिरजू महाराज अष्टपैलू कलाकार, महान गुरू होते. नुकतेच त्यांच्यावर नृत्यसम्राट पंडित बिरजू महाराज हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे प्रकाशन पंडितजींनी स्वहस्ते दिल्ली येथे केले होते. ते पुस्तक त्यांना अतिशय आवडले होते. दोन तासांपूर्वीच मी त्यांच्याशी बोललो होतो आणि नंतरही दु:खद बातमी आली.
अशा अनेक आठवणींना प्रख्यात कथक नर्तक पंडित नंदकिशोर कपोते यांनी दैनिक प्रभात शी बोलताना उजाळा दिला. पं. कपोते यांनी सांगितले की, पुस्तक प्रकाशनावेळी पंडितजी म्हणाले होते की, अशा प्रकारचा दुर्मिळ फोटोंचा संग्रह फक्त नंदकिशोरकडे आहे. 29 मे 2021 पासून महाराजांनी मला ऑनलाइन पद्धतीने शिकवायला सुरुवात केली.
हे माझे मोठे भाग्य होते. 15 दिवसांपूर्वी मी त्यांच्याकडून धडे घेत होतो. या दरम्यान शिकवण्यात आलेल्या बंदिशी या माझ्यासाठी अनमोल खजिना आहे. महाराजांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे होत होते. ते जाण्यापूर्वी 2 तास आधी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे झाले होते. त्यावेळी अशी कल्पना ही नव्हती की ते दोन तासांनी ते नसणार आहेत.
त्यांच्या जाण्याने नृत्य क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक तेजस्वी- देदीप्यमान तारा निखळला आहे. माझे आई – वडील, परमेश्वर, गुरू व मार्गदर्शक सर्व काही तेच होते. जोपर्यंत नृत्य आहे तोपर्यंत ते आपल्यात सदैव राहतील, अशी भावना पंडित कपोते यांनी व्यक्त केली.