पार्ल – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. हा सराव करत असताना एक नवी गोष्ट घडली. एकदिवसीय संघाचे नेतृत्व असलेल्या लोकेश राहुलने सर्व खेळाडूंशी या सरावादरम्यान चर्चा केली. त्यात मावळता कर्णधार विराट कोहलीनेही शांतचित्ताने राहुलचे म्हणणे ऐकून घेतले.
या दोन संघात येत्या बुधवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यासाठी दोन्ही संघ येथे दाखल झाले आहेत. या मालिकेद्वारे कोहली पहिल्यांदाच अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार्ल, तर तिसरा व अखेरचा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे.
कसोटी मालिका गमावलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेसाठी कसून सराव सुरू केला आहे. खेळाडूंच्या सरावाचा एक फोटो बीसीसीआयनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात नवनियुक्त कर्णधार राहुल खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. तर कोहलीसह अन्य खेळाडू त्याचा सल्ला ऐकत आहेत.
एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून राहुलची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. याआधी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपद भूषवले होते.