मुंबई – मुक्ता बर्वे (Mukta Barve) मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या मुक्ता तिच्या ‘चारचौघी’ या नाटकामुळे चर्चेत आली आहे. प्रेक्षकांचा देखील या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु आता मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रवासादरम्यान एक अनुभव शेअर केला आहे.
मुक्ता बर्वेने पोह्यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत पोस्टमध्ये तिने लिहिले की, “माझा विश्वासच बसेना, खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिकला जाताना पडघा टोलनंतर खूप कौतुकाने थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!”
“जरा चव यावी म्हणून कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहीच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीशमध्ये कोणीतरी एवढी अनास्था वाढून दिली याचं वाईट वाटलं,” असं मुक्ताने लिहीले आहे.
View this post on Instagram
मुक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “गिर्हाइक जास्त झाले की गुणवत्ता कमी होते.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “उपकार केल्या सारखे पोहे केलेत असं वाटतंय ते पाहून.” सध्या मुक्ताची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, मुक्ता ‘रावसाहेब’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.