औरंगाबाद – सध्या शिवसेनेचे मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या मदतीमुळेच आपण खासदार म्हणून विजयी होऊ शकलो, असे विधान जाहीर कार्यक्रमात सत्तार यांच्या उपस्थितीत करून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एक गुगली टाकली.
अब्दुल सत्तार हे त्यावेळी कॉंग्रेसमध्ये होते. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. इम्तियाज जलील यांनी त्यावेळची निवडणूक एमआयएमतर्फे लढवली होती, इम्तियाज जलील यांना वंचितचा पाठिंबा देखील होता.
लोकसभेत निवडून जाण्यापूर्वी इम्तियाज जलील महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होते. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा गावातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात इम्तियाज जलील बोलत होते.
सध्या शिवसेनेत आणि राज्यमंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी त्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस आमदार असून देखील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मदत केल्याचे जाहीर केल्याने कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.