नवी दिल्ली – कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे गोमांस संदर्भात वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. सिद्धरामय्या म्हणाले, मी हिंदू आहे आणि मी कधीच गोमांस खाल्ले नाही. मात्र मला हवे असल्यास मी बीफ खाऊ शकतो. हा माझ्या इच्छेचा प्रश्न आहे. आरएसएस माणसांमध्ये भेद निर्माण करत असल्याचा आरोपही काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी यावेळी केला.
तुमाकुरू येथील एका कार्यक्रमात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी त्यांनी संघाचे लोक समुदायांमध्ये संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप केला. “गोमांस खाणारे हे केवळ एका समुदायाचे लोक नाहीत.’ असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी हिंदू आहे. मात्र मी अजून बीफ खाल्ले नाही. पण मला हवे असल्यास मी बीफ खाऊ शकतो. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असा सवालही त्यांनी केला. गोमांस खाणारे फक्त एका समुदायाचे नसतात. हिंदूही गोमांस खातात, ख्रिश्चनही खातात. यापूर्वीही कर्नाटक विधानसभेत मी एकदाही म्हटले होते की, मी गोमांस खाऊ नये, असे सांगणारे तुम्ही कोण आहात. ? खाण्यापिण्याच्या सवयींचा मुद्दा आहे. हा ज्याचा त्याच्या हक्क आहे.’ असंही ये म्हणाले. त्यांच्या या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.
कर्नाटकात भाजप सरकारने कायदा आणला
कर्नाटकातील भाजप सरकारने जानेवारी 2021 मध्ये कर्नाटक कत्तल प्रतिबंध आणि गोवंश संरक्षण कायदा, 2020 आणला. त्यानुसार सर्व प्रकारच्या गुरांची खरेदी, विक्री, वाहतूक, कत्तल व व्यापार करणे बेकायदेशीर आहे. त्यात गायी, बैल, म्हैस यांचा समावेश आहे.
13 वर्षांवरील म्हशी आणि गंभीर आजारी गुरे या कायद्याला अपवाद आहेत. परंतु पशुवैद्यकाने प्रमाणित केल्यानंतरच त्यांची कत्तल केली जाऊ शकते. या कायद्याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. यासोबतच 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.