मुंबई – सलामीवीर अभिषेक शर्मा व एडन मार्करम यांनी फटकावलेल्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेतील सामन्यात गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 196 धावांचे आव्हान ठेवले. महंमद शमी, यश दयाळ व अल्झारी जोसेफ यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला सुरुवातीच्या काही षटकांत तसेच अखेरच्या काही षटकांत वेगाने धावा करता आल्या नाहीत.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा निर्णय सार्थ ठरवताना शमीने केन विल्यम्स व राहुल त्रिपाठी यांना बाद करत थाटात प्रारंभ केला. त्रिपाठी 16 धावांवर स्थिरावल्यावरही अनावश्यक फटका मारून बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्मा व मार्करमने महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली व त्यानंतरही धावा वेगाने जमवल्या.
अभिषेकने धावांचा वेग वाढवत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र, आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो 42 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 65 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्करम 40 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 56 धावांवर बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन व वॉशिंग्टन सुंदर यांनी साफ निराशा केली. मात्र, अखेरच्या षटकात शशांक सिंगने अवघ्या 6 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 25 धावांची खेळी केली.
त्याला योग्य साथ देताना मार्को जेन्सनने नाबाद 8 धावा केल्या. त्यांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. गुजरातकडून महंमद शमीने 3 गडी बाद केले. यश दयाळ व अल्झारी जोसेफने प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक :-
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 6 बाद 195 धावा. (अभिषेक शर्मा 65, एडन मार्करम 56, राहुल त्रिपाठी 16, शशांक सिंग नाबाद 25, मार्को जेन्सन नाबाद 8, महंमद शमी 3-39, यश दयाळ 1-24, अल्झारी जोसेफ 1-35).