हैदराबाद – वडिलांकडून नकळतपणे मुलाच्या अंगावर कार चढवली. या दुर्घटनेत गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथी एलबी नगर येथे घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला असून हृदय पिळवटून टाकणारा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
@SpaceAuditi ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, रस्त्यावर एक कार उभी आहे. एक व्यक्ती त्या कारच्या दिशेने जाते. ती व्यक्ती कारमध्ये जाऊन बसते. त्याच्यामागो माग एक मुलगाही जातो. तोसुद्धा कारमध्ये बसतो. थोड्या वेळाने आणखी एक लहान मुलगा तिथं दिसून येतो. तोसुद्धा कारकडे धावत जातो. कारच्या आजूबाजूला खेळू लागतो. वडील आता गाडीत असल्याने त्यांचा लेक गाडीजवळ आहे, याची त्यांना कल्पना नाही. मुलगा आधी गाडीच्या मागे जातो आणि थोड्या वेळाने पुढे येतो. त्याचवेळी गाडी सुरू होते. चिमुकला रस्त्यावर पडतो आणि गाडी त्याच्यावरून जाते.
https://twitter.com/SpaceAuditi/status/1462997872186572801
गाडी चिमुकल्याच्या अंगावरून जाते तेव्हा मुलगा गाडीच्या मधोमध होता. त्याची वाचण्याची शक्यता होती. पण थोडं पुढे गेल्यानंतर गाडी थोडी क्रॉस होऊन पाठीमागे येते आणि त्याचवेळी कदाचित मुलाच्या अंगावरून चाक गेलं असावं. गाडीखाली आपला मुलगा आला आहे, हे समजताच वडीलांना धक्का बसतो. ते धडपडत गाडीतून बाहेर पडतात. आपल्या चिमुकल्याला उचलून घराच्या दिशेने धावतात. दरम्यान, घटनेनंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.