मुंबई – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्यांची निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने सईद खान यांची मालमत्ता जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
ही चौकशी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात सुरू आहे. या प्रकरणी इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन 8 कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची 3.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांची 30 ऑगस्ट रोजी झाडाझडती घेण्यात आली होती. यासंदर्भात भावना गवळी यांना 27 सप्टेंबरला समन्स बजावून 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.