* जातेगाव खुर्दला महिलेचा खून
* डॉक्टरांची सतर्कता कारणीभूत
शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीचा मारहाण करून खून केला. खून केल्यानंतर अपघाताचा बनाव करणाऱ्या पतीची डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे फसला. रुपाली सचिन खंडाळे (वय 34, रा. जातेगाव खुर्द), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपालीचा भाऊ ललित दत्तात्रय गावडे (वय 26, रा. गणेगाव खालसा, ता. शिरुर)
यांनी फिर्याद दाखल केली आहे. सचिन दत्तात्रय खंडाळे, असे आरोपीचे नाव आहे.
जातेगाव खुर्द येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू पीत असल्याने वाद होत होते. (दि.2) सचिन याच्या आजोबांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता. मात्र, सचिन त्या कार्यक्रमाला न थांबता रानातील पोल्ट्रीवर थांबला होता. त्याने पत्नी रुपाली हिला देखील तेथे बोलावून घेतले होते. रात्री उशिरा रुपाली पती सचिनकडे पोल्ट्रीवर गेली असता त्यांच्यामध्ये वाद झाले.
पहाटेच्या सुमारास रुपालीला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथे आणले. तिच्या डोक्यात तसेच गळ्यावर काही जखमा होत्या. रुपाली हिचा मृत्यू झाला होता. याबाबत रुपालीच्या नातेवाईकांनी सचिन यास विचारपूस केली असता त्याने रात्री आमच्यात वाद झाल्याने मी रुपाली हिला मारल्याचे सांगितले. नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सचिन दत्तात्रय खंडाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे करीत आहेत.
असा फसला बनाव
पत्नीच्या खुनानंतर आरोपी सचिन याने काही वेळ पत्नीबाबत कोणासही काही न सांगता रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. मात्र, डॉक्टरांच्या तत्परतेने घटनेला वाचा फुटत अपघाताचा बनाव फसला गेला आहे. त्यामुळे पती सचिन याला कारागृहाची हवा खावी लागली.