प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 –बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत करोनाची साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत 7 लाख 57 हजारांहून अधिक “आरटीपीसीआर’ चाचण्या झाल्या असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करणारी ती एकमेव प्रयोगशाळा ठरली आहे.
राज्यात करोनाची तपासणी करणाऱ्या 74 सरकारी प्रयोगशाळा या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. तर, काही महापालिकेची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि पुण्यातील “राष्ट्रीय विषाणू विज्ञान अनुसंधान’ (एनआयव्ही) या प्रयोगशाळांचा समावेश होतो. यामध्ये करोना तपासणीत सर्वाधिक चाचण्या या “बीजे’ने केल्या आहेत.
या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, सहायक आणि सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक यांनी रात्रंदिवस मेहनत घेतल्याने तसेच अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
सन 2020 मध्ये पुण्यात “एनआयव्ही’मध्ये करोनाची आरटीपीसीआर चाचणी होत होती. त्याच मार्च महिन्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला तपासणीसाठी परवानगी मिळाली. त्यावेळी येथे प्रतिदिन तीन ते चार हजार आणि आता एक ते दीड हजार नमुन्यांची चाचणी होत असे.
तपासणीचा कमी कालावधी
अमेरिकेतही तपासणीचा कालावधी हा एक दिवसाचा असायचा; परंतु “बीजे’चा तपासणीचा कालावधी हा कमीतकमी साडेतीन तासांचा होता. म्हणजे सॅंपल घेतल्यानंतर साडेतीन तासांत त्याचा निकाल हातात दिला गेला आहे. “एनआयव्ही’मध्ये आतापर्यंत केवळ 4 लाख 5 हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
आजपर्यंतच्या चाचण्या
आरटीपीसीआर – 6 लाख 67 हजार
अँटीजेन – 93 हजार
एकूण – 7 लाख 67 हजार