वडूज – येथील खटाव तालुका पंचायत समितीच्या आवारातील ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग या कार्यालयाच्या आवारात आज सकाळी शासकीय अधिकारी उपस्थित होण्यासाठी आले असतानाच एका पतीविरोधात आक्रमक झालेल्या पत्नी व मुलांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, वैयक्तिक कारणामुळे घरातील चार भिंतीआतील भांडणाची मजल अक्षरशः रस्त्यावर उतरून एकमेकांना मारहाण करण्यापर्यत गेली.
सकाळी सकाळी पंचायत समितीच्या आवारात होत असलेल्या भांडणामुळे बघ्याची गर्दी वाढली होती. सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच- सरपंच परिषदेसाठी खास उपस्थित असलेले विजयकुमार शिंदे, योगेश जाधव यांनी मोठ्या धाडसाने जीव धोक्यात घालून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दाम्पत्याला बाजूला सारून त्याठिकाणी आलेल्या अधिकारी वर्गाने पतीला सुरक्षितस्थळी हलविल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर तातडीने पोलीस वाहनातून सर्वाना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पत्नी, सज्ञान मुले व एक अल्पवयीन मुलगा व इतर दोन मुले यांच्याविरोधात रात्री उशिरा
वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या वेळी वडूज पंचायत समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पण, महिलेचे रागीट रूप पाहून अनेकांनी पुढे जाण्याचे धाडस केले नाही. कार्यक्रमानिमित्त त्या वेळी आवारात आलेले सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, योगेश जाधव व अन्य एका व्यक्तीने धाडस दाखवून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्यांनाही किरकोळ जखम झाली. या घटनेची वडूज पोलीस ठाण्यात जीव मारण्याचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आदींसह विविध कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. शांताराम ओंबासे तपास करीत आहेत.