पिंपरी -आषाढीवारी पालखी सोहळ्या निमित्ताने शहरात येणाऱ्या वारकरी बांधवांना आषाढीवारी यात्रा सुलभ व आरोग्यदायी व्हावी यासाठी दिंडी प्रमुखांना महापालिकेच्या वतीने प्रथमोपचार पेटी व संपर्क माहिती पुस्तिका भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन आज शहरात होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे.
आषाढीवारी पालखी यात्रा सुलभ, आरोग्यदायी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रथमोपचार पेटीचे अनावरण आणि संपर्क माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ व अधिकारी उपस्थित होते. प्रथमोपचार पेटीमध्ये थंडी तापाच्या गोळ्या, सर्दी, खोकल्याच्या गोळ्या, मलम, बॅंडेज, सावलोन लिक़्व्6व्6व्6व्6िवड, ओ.आर.एस. पावडर, अशा 15 वस्तूंचा समावेश आहे.
दरम्यान, याचवेळी आयुक्त पाटील यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर यांना मार्गक्रमण करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी बोलताना आयुक्त पाटील म्हणाले, यंदाच्या पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरविणे व वारी प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपुरक करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज असून शहरात महापालिकेच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी पुरुष व स्त्रियांकरिता स्वतंत्र फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या शाळा व खाजगी शाळा उपलब्ध करून देणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पालखीमार्गावर खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी स्टॉलधारकांना परवाने देण्याची कार्यवाही, कचरा संकलनासाठी घंटागाडी उभ्या करण्याची व्यवस्था, महिलांसाठी ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची सोय करण्यात आलेली आहे.
पालखी सोहळ्याच्या कालावधीत वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये 24 तास मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावर फिरता दवाखाना आणि तसेच वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका, विविध यंत्रणांसाठी मोबाइल बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली.