सातारा -केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील इएसआय कार्पोरेशन मार्फत साताऱ्यामध्ये नवीन 100 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. इएसआय कार्पोरेशनच्यातर्फे याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्रसिंह यादव यांनी केली असून साताऱ्यात सैनिक हॉस्पिटल आणि इएसआय हॉस्पिटल उभारणीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यापैकी 100 खाटांचे इएसआयसीचे हॉस्पिटलला मंजुरी मिळाल्याने त्याचा लाभ जिल्हयातील इएसआय योजना लागू असणाऱ्या लाखो कामगारांना होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सक्षम सार्वजनिक आरोग्य सुविधा ही आज काळाची गरज बनली आहे, असे नमूद करुन उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, करोना काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवकांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये म्हणून अधिकाधिक सार्वजनिक सुविधा विविध माध्यमातून सुरु करण्यासाठी आम्ही सैनिक हॉस्पिटल आणि इएसआय हॉस्पिटल स्वतंत्रपणे सुरु करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्तावित केले आहे.
त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. केंद्र शासनाच्या कामगार खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या इएसआय कार्पोरेशने महाराष्ट्रात सहा ठिकाणी 100 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत धोरण आखले असून त्या धोरणानुसार महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल या ठिकाणी इएसआय हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे. संपूर्ण देशात 23 ठिकाणी अशी हॉस्पिटल्स सुरु करण्यात येणार असून पैकी सर्वांत जास्त महाराष्ट्रात सहा ठिकाणी रुग्णालयांची उभारणी होणार आहे.
इएसआय हॉस्पिटलच्या उभारणीकरीता काही जागा सुचवलेल्या आहेत, त्यापैकी एका जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. जागा निश्चिती झाल्यावर या ठिकाणी इएसआय कार्पोरेशनचे 100 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल. जिल्हयात कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच इएसआय योजना लागू असेलेले कामगारसुध्दा काही लाखात आहेत. त्या सर्व कामगारांना या रुग्णालयाचा मोठा आधार लाभणार आहे. लवकरच सैनिक हॉस्पिटल देखिल सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.